धुमधडाक्यात झाली कुत्र्यांची लग्ने आणि हनिमून

श्रीलंका – धुमधडाक्यात लग्न आणि नंतर हनिमून ही केवळ माणसाची मक्तेदारी राहिलेली नाही हे सिद्ध करणारी घटना श्रीलंकेत घडली आहे. श्रीलंकन पोलिसांनी त्यांच्या ताफ्यातील ९ स्निफर कुत्र्यांच्या जोड्यांची पारंपारिक बौद्ध धर्म पद्धतीने लग्ने लावली आणि त्यांना पोलिस व्हॅनमधून हनिमूनलाही नेले. म्हणजे पोलिसांनी कुत्र्यांच्या लग्नासाठी मांडवापासून हनिमूनपर्यंत सर्व व्यवस्था ठेवली.

लग्नाच्या वेळी कुत्र्यांना पारंपारिक विवाह पोशाख म्हणजे शाल, हॅट आणि मोजे घातले होतेच पण ही लग्ने रजिस्टरही केली गेली. या विवाहसमारंभाला जनावरांचे डॉक्टर, पोलिसांतील उच्च अधिकारी, सर्वसामान्य जनता आणि प्रेसवाले उपस्थित होते. मात्र लग्नसमारंभ पार पडताच वेगळ्याच वादाला तोंड फुटले आणि स्पष्टीकरण देता देता श्रीलंकन पोलिसांच्या नाकीनऊ आले.

कूत्र्यांची बौध्द परंपरेप्रमाणे लग्ने हा बौद्धधर्माचा अपमान असल्याची टीका पोलिसांवर झाली. तेव्हा पोलिसांनी चक्क माफी मागून धर्माचा अपमान करण्याचा यात अजिबात उद्देश नव्हता असा खुलासा केला. स्निफर डॉग ही पोलिस दलाची आवश्यकता आहे मात्र ही कुत्री बाहेरून मागवावी लागतात आणि त्यासाठी बक्कळ पैसा मोजावा लागतो. यामुळे स्कवाडमध्ये असलेल्या कुत्रांचीच आपसात लग्ने लावावीत आणि त्यांची प्रजा वाढवावी असा पोलिसांचा उद्देश होता.

२०११ साली नेदरलँड मधून मागविलेल्या या कुत्र्यांसाठी पाच लाख डॉलर्स खर्ची पडले आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment