नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जम्मू येथील जाहीर सभेत भारतीय घटनेच्या ३७० व्या कलमावरून चर्चा उपस्थित करून दिली आहे आणि देशातले सर्वच पक्ष इमाने इतबारे या कलमाच्या बाजूने आणि मोदींच्या विरोधात बोलत आहेत. भारतीय घटनेतले हे तात्पुरते कलम मुस्लीम समाजाच्या हितासाठी केलेले आहे, असा गैरसमज सार्या देशात निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष मुस्लीम मतांच्या आशेने या कलमाच्या बाजूने बोलत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी या कलमावरच्या चर्चेत आपले मत मांडले असून या कलमाचा सेक्युलॅरिझमशी किंवा मुस्लीम समाजाशी काहीही संबंध नाही हे आवर्जून नमूद केले आहे. या कलमाने उपलब्ध झालेल्या तरतुदी जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी जाचक आहेत, असेही जेटली म्हणाले.
३७० व्या कलमाच्या बाजूने बोलणारे नेते राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी बोलतात आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असेही म्हणतात. परंतु दुसर्या बाजूला जम्मू-काश्मीर राज्याला आणि तिथल्या जनतेला भारतापासून तोडणार्या या कलमाचा पुरस्कारही करतात या विसंगतीकडे जेटली यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.