येडीयुरप्पांना लवकर पक्षात आणणार

बंगळूर- कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना लवकरात लवकर पक्षात परत आणण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती लागताच याबाबत त्वरेने हालचाली केल्या जाणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातल्या भाजपा नेत्यांनी येडीयुरप्पा यांच्या पक्षात परत येण्यास अनुमती दर्शवली असल्याने आता त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायला भाग पाडण्यात आले होते पण त्यांनी पद सोडताना भाजपालाही सोडचिठ्ठी दिली होती आणि नवा पक्ष स्थापन केला होता. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली आणि येडीयुरप्पा यांनाही काही ङ्गायदा झाला नाही. दोघांच्या वादात कॉंग्रेसला सत्ता मिळाली. त्यामुळे आता येडीयुरप्पांनाही पश्‍चात्ताप झाला आहे. ते पक्षात परत आले तर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी येडीयुरप्पा यांना येत्या आठ तारखेला चर्चेसाठी दिल्लीत बोलावले आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपाला चांगले यश मिळाले तर येडीयुरप्पा यांना भाजपात येण्यात रस वाटेल आणि भाजपालाही त्यांच्यावर दबाव वाढवून त्यांना काही अटीवरच पक्षात घेता येईल असे पक्षाला वाटते.