सज्जन कुमारना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली – काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी १९८४ सालच्या शीख विरोधी दंगलीतील आरोप रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे हा कोर्टाचा निकाल सज्जनकुमारसाठी झटकाच मानला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हत्येचा आरोप रद्द करण्याची सज्जन कुमार यांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने त्यांना खटल्याला सामोरे जाण्याचे निर्देश दिले. ३१ ऑक्टोंबर १९८४ रोजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकाने हत्या केल्यानंतर दिल्लीत शीखां विरोधात दंगल उसळली होती. सज्जनकुमार यांच्यावर हत्या, दंगल आणि दोन समाजांमधील तणावाला खतपाणी घातल्याचा आरोप आहे.

कॉग्रेस नेते सज्जन कुमार यांच्या चिथावणीमुळे दिल्लीच्या सुल्तानपूरी भागात सहाजणांची हत्या झाली होती. सज्जन कुमार यांच्या विरोधात थेट हत्येचा आरोप नसल्यामुळे त्यांना ३०२ कलमाखाली आरोपी बनवता येणार नाही हा वकिल मुकूल रोहतागी यांचा युक्तीवाद न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेटाळून लावला. सज्जन कुमार यांच्या चिथावणीमुळेच सुल्तानपूरी भागात हत्या झाल्याचा दंगल पिडितांचे वकिल दुष्यंत दवे यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला आहे.

Leave a Comment