शिक्षणाच्या आयचा घो

शिक्षणाचा हेतू काय असावा, या प्रश्‍नाचे उत्तर शिक्षण न घेतलेल्या एका वृध्द खेडूताने दिले होते. आजवर एकाही शिक्षण तज्ञाला एवढ्या समर्पकपणे शिक्षणाचा हेतू सांगता आला नसेल. या खेडूताने म्हटले होते, शिक्षणाने तीन गोष्टी आल्या पाहिजेत. हुनर, हिसाब आणि हिंमत. आपल्या शिक्षणाने या तीन गोष्टी येतात का याचा विचार केला तर ङ्गार निराशाजनक स्थिती दिसते. आपले शिक्षण कसे दिशाहीन आहे याचे चित्रण सचिन खेडेकर यांच्या शिक्षणाच्या आयचा घो या मराठी चित्रपटात परिणामकारकपणे केलेले आहे. भारताच्या शिक्षणाचे धोरण ठरविणार्‍या तज्ञांनी हा चित्रपट पाहिलेला दिसतोय. कारण गेल्या साठ वर्षापासून जी गोष्ट त्यांच्या लक्षात यावी असे आपण म्हणत होतो ती त्यांच्या आता लक्षात आली आहे. शिक्षणाचा आणि पोटापाण्याच्या व्यवसायाचा काहीतरी थेट संबंध असावा असे अनेकवेळा म्हटले जात होते. पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांना जीवनाशी थेट संबंध नसलेले कौशल्य देण्यासाठी विनाकारण शिक्षणाच्या चरकातून पिळून काढत होतो. एखादा बी.ए. झालेला विद्यार्थी वर्षानुवर्षे बेकार बसतो परंतु सायकल दुरूस्त करणारा एखादा मुलगा तेवढ्या कौशल्याच्या जोरावर शिक्षण नसतानासुध्दा बी.ए. झालेल्या विद्यार्थ्यापेक्षा चांगली कमाई करतो. तेव्हा हा बी.ए, च्या चरकातून पिळून निघालेला विद्यार्थी मनातल्या मनात शिक्षणाच्या आयचा घो म्हणून शिक्षणाला शिव्या देत राहतो.

तोसुध्दा शिक्षणाबद्दल निर्माण झालेल्या चुकीच्या कल्पनांचा बळी असतो. आता शिक्षणातली ही विसंगती सरकारच्या उशिरा का होईना पण लक्षात आली आणि सरकारने थेट नोकर्‍या न देणार्‍या बी.ए आणि बी.एएससी या दोन पदव्या बंद करण्याचा आणि त्यांच्या जागी व्यवसाय शिक्षणाच्या पदव्या देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘देर आये दुरूस्त आये’. शिक्षणातून पोटापाण्याचा मार्ग सुचला पाहिजे पण तसे होत नाही. आपल्या शिक्षणाने पोट भरण्याचे कसबसुध्दा मुलांमध्ये येत नाही. त्यामुळे पदवीधर होऊनसुध्दा मुले बेकार राहतात. कोणती पदवी मिळवावी आणि तिच्यापासून आपल्याला कोणती नोकरी मिळेल याबाबतीतही ते पूर्ण अनभिज्ञ असतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या हजारो तरुण-तरुणींनी डी.एड किंवा बी.एड होऊन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले. परंतु शिक्षकाच्या जागा किती निर्माण होउ शकतात आणि किती लोकांनी हे शिक्षण घेतले पाहिजे याचा कसलाच ताळतंत्र राहिलेला नाही. मुले मेंढरासारखी डी.एड आणि बी.एडला प्रवेश घेत आहेत.

त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. त्यामुळे या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी गावागावात शिक्षण महर्षींनी डी.एड, बी.एडचे कारखाने काढले. या मुलांना शिक्षण देणे हे त्यांची ङ्गसवणूक आहे हे माहीत असूनसुध्दा हे कारखाने जाहिराती करून मुलांना प्रवेश देत गेले. परिणामी आता लाखों डी.एड. आणि बी.एड बेकार ङ्गिरत आहेत. उस्मानाबाद येथे एका सरकारी कार्यालयात असे डी.एड., बी.एड झालेले १२० तरुण चपराशाची नोकरी करत आहेत. चपराशाची नोकरी करणे चूक नाही पण हीच नोकरी करायची होती तर जमिनी आणि सोने विकून या मुलांना बी.एड करायला का लावले हा प्रश्‍न मनाला सतावतो. सामान्य बौध्दीक कुवतीची मुले दहावी बारावीनंतर अन्य कोणत्याही मार्गाला जाण्यापेक्षा कला शाखेकडे जाणे पसंत करतात आणि तिथे वर्गात हजरसुध्दा न राहता परीक्षा देतात, जेमतेम पास होतात. त्यांना बी.ए.ची पदवी महत्त्वाची नसते. त्यांच्यासाठी बी.ए.ची पदवी बी.एड. होण्यासाठीचे साधन असते आणि अशी मुले बी.एड. होऊन लटकत राहतात. एका बाजूला अशी बेकार मुले फीरत असताना अनेक संस्थाचे व्यवस्थापक आणि कारखान्यांचे अधिकारी त्यांच्या कारखान्यात काम करण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक कौशल्य प्राप्त केलेली मुले शोधत असतात. म्हणजे एका बाजूला दिशाहीन शिक्षण घेऊन मुले बेकार ङ्गिरत असतात. तर दुसर्‍या बाजूला योग्य ते कौशल्य हस्तगत केलेली मुले मिळत नाहीत म्हणून नोकर्‍या देणारे लोक फीरत असतात.

आपल्या समाजामध्ये अशी एक विसंगती शिक्षणाच्या नावावर निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता जी पदवी घेतली असता तिच्या जोरावर थेट नोकरी मिळणार नाही अशा पदव्यांचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १९६० ते ७० च्या दशकामध्ये कसेही करून लोकांना शिकवले पाहिजे म्हणून दिशाहीन शिक्षणाचे कारखाने काढले गेले. त्या दिशाहीन शिक्षणामुळे निर्माण झालेले वातावरण बदलण्यासाठी प्रथमच योग्य पाऊल टाकले गेलेले आहे. या पावलानुसार येत्या काही वर्षात बी.ए. आणि बी.एएस्सी या दोन पदव्यांचे शिक्षण बंद केले जाणार आहे. विद्यार्थ्याला आवडो की न आवडो, व्यवहारी जीवनामध्ये उपयोगी पडो की न पडो त्याला निरर्थक शिक्षण घ्यावेच लागते. निरर्थकपणे शिक्षण घेऊन बी.ए. झालेल्या मुलाला पोटापाण्याचे आयटीआयचे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यापेक्षा अधिक मान दिला जातो. आपल्या समाजातली ही विसंगती कमी करण्यासाठी सरकारने या दोन निरर्थक पदव्या का होईना पण बंद करायचे ठरवले आहे ते बरे झाले.

Leave a Comment