मोदीना 370 कलम रद्द करणे अशक्य- फारूख अब्दुल्ला

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील जाहीर सभेनंतर मोदींच्या काश्मीरविषयीच्या भूमिकेवरून नवा वाद सुरू झाला आहे. काश्मीरसाठी विशेष राज्य म्हणून असलेली तरतूद घटनेच्या कलम 370 अन्वये आहे. घटनेतील कलम 370 हे काढून टाकावं ही भाजपची खूप जुनी म्हणजे जनसंघाच्या काळापासूनची मागणी आहे. आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काश्मीरींना स्वतंत्र राज्य हवे की विशेष राज्य हवे, म्हणजेच सेपरेट स्टेट हवे की सुपर स्टेट हवे अशी विचारणा करून एका नव्या वादाला जन्म दिला.

त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. त्यावर भाजप अजून शांत असलं तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि तिथल्या सत्ताधारी असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारूख अब्दुल्ला यांनीही आता नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. मोदींना आव्हान देताना त्यांनी तर नरेंद्र मोदी दहा वेळा पंतप्रधान झाले तरी काश्मीरसाठी विशेष राज्याची तरतूद करणारं घटनेतील 370 हे कलम काढू शकणार नाहीत, असं म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांना सलग दहा टर्म म्हणजे पन्नास वर्षे पंतप्रधानपद मिळालं तरी ते 370 कलम काढू शकणार नाहीत. असं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. काश्मीरसाठी असलेल्या विशेष दर्जाबाबत राष्ट्रीय चर्चा व्हायला हवी, असं मोदींनी आपल्या जम्मूतील सभेत म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी मोदी राष्ट्रीय चर्चेची मागणी करतात, भाजप तर कधीच चर्चेची मागणी करत नाही किंवा कोणत्या चर्चेत भाग घेत नाही, असं सांगितले आहे.