धुळे, नंदूरबार जि.प. वर काँग्रेसची सत्ता

धुळे- अकोला, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज सोमवारी जाहीर झाले. नंदूरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते विजयकुमार गावितांना धक्का बसला आहे. 55 जागांपैकी काँग्रेसने 29 जागा जिंकत सत्ता मिळवली. तर मागच्या निव़डणुकीत 32 जागा जिंकणार्‍या राष्ट्रवादीला यंदा 25 जागाच मिळवता आल्या. एका जागी भाजपाचा उमेदवार विजयी झाला. तर धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

मागच्या निवडणुकीत 14 जागा जिंकणार्‍या शिवसेनेला यंदा केवळ 2 जागाच जिंकता आल्या. भाजपाने 13 जागी विजय मिळवला. तर काँग्रेसने 56 पैकी 30 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागी विजय मिळवला असून चार जागी अन्य उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने सर्वाधिक 22 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने जिल्ह्यात मुसंडी मारत चार जागांवरून 12 जागांवर झेप घेतली आहे.

या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सफाया झाला. या निवडणुकीत भारिप – बहुजन महासंघाच्या उमेदवार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा इंगळेंना पराभव सहन करावा लागला आहे.