दिल्लीत काँग्रेस, भाजपची केवळ 11 महिलांना उमेदवारी

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीचे मुख्यमंत्रिपद सलग तीनदा भूषवुन शीला दीक्षित यांनी भलेही हॅट्ट्रिक साधली असेल. मात्र, लोकसभा आणि राज्यांच्या विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा देणार्‍या भाजप आणि काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत केवळ 11 महिलांना उमेदवारी दिली आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 सदस्यांच्या सभागृहात भाजप व काँग्रेसकडून 11 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेसने केवळ 6 महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजपने एकूण 66 उमेदवारांमध्ये 5 महिला उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने चार जागा अकाली दल या मित्रपक्षाला सोडल्या आहेत. आम आदमी पक्षाने 6 महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

महिला उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले नसल्याचा या पक्षांचा दावा आहे. या निवडणुकीत महिलांची उमेदवारी ही परिस्थितीवरही अवलंबून आहे. महिलांच्या 33 टक्के आरक्षणाला आम्ही निश्‍चितपणे पाठिंबा देतो, असे भाजपचे दिल्लीचे माजी प्रमुख विजेंदर गुप्ता यांनी सांगितले, तर निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकिटे देण्यात आल्याचे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले या तीन प्रमुख पक्षांचे महिला उमेदवार आणि दिल्लीतील महिला मतदारांचे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे. दिल्ली विधानसभेसाठी एकूण एक कोटी 19 लाख मतदार आहेत. त्यापैकी 53 लाख महिला आणि 66 लाख पुरुष आहेत. या निवडणुकीत एकूण 810 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यापैकी 70 उमेदवार या महिला आहेत.