दहशतवादी हल्ल्याविरोधात पुणे पोलिस सज्ज

पुणे – राज्यात मुंबईप्रमाणेच पुण्यावरही दहशतवादी हल्ले होण्याचा धोका लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स टीम तयार केली असून त्याना विशेष प्रशिक्षणही दिले जात असल्याचे समजते. मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना हल्ला झालेल्या ठिकाणांची अंतर्गत रचना माहिती नसल्याने दहशतवाद्यांशी मुकाबला करणे कठीण केले होते हे लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा धोका असलेल्या १६ अतिसंवेदनशील व १५२ संवेदनशील जागांची अंतर्बाह्य रचना दाखविणारे व्हिडीओ तयार केले आहेत आणि त्यावरूनच या विशेष टीमला प्रशिक्षण दिले जात आहे.

अतिसंवेदनशील ठिकाणांत दगडूशेट हलवाई गणेश मंदिर, लाल देऊळ, छाबड हाऊस, ओशो कम्युन यांचा तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, डीआडीओ, सदर्न कमांड या जागांचा समावेश आहे. या सर्व जागांची संपूर्ण कानाकोपर्‍यासह रचना दाखविणारे वॉक थ्रू व्हिडीओ तयार केले गेले असल्याचे व त्यावरून पथकाला प्रशिक्षण दिले जात असल्याचे समजते. यामुळे आणीबाणी उद्भवलीच तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड पोहोचेपर्यंत हे विशेष पथक कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम बनले असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकारी सांगतात.

या सर्व संवेदनशील जागांचे दर तीन महिन्यानी सुरक्षा ऑडिट केले जात आहे. स्थनिक पोलिस, विशेष विभाग पोलिस, राज्य गुप्तवार्ता यंत्रणा, इंटेलिजन्स ब्युरो यांना संबंधित ऑडिट दाखवून सुरक्षेत कोणत्या त्रुटी आहेत याची माहिती व सल्ला घेतला जात आहे तसेच प्रतिबंधात्मक उपायही योजले जात आहेत असे विशेष विभागाचे उपायुक्त एम.बी. तांबडे यांचे म्हणणे आहे. सूचना व सुरक्षेबाबत लष्करी अधिकार्‍यांबरोबर नियमित बैठकाही घेतल्या जात आहेत तसेच खासगी संस्थांना सुरक्षेबाबत कोणत्या त्रुटी आहेत याची लेखी सूचना दिली जात आहे असेही तांबडे यांनी सांगितले.

Leave a Comment