बँकॉक- थायलंडमध्ये गेला आठवडाभर सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर या देशाची वाटचालही सिरीयाच्या दिशेने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान योंगलुक शिनावात्रा यांनी आंदोलकांना तोंड द्यावे लागू नये म्हणून आपले अधिकृत शासकीय निवासस्थान सोडून परदेशात पळ काढल्याचे समजतेे. मात्र, सरकारी सूत्रांनी याला दुजोरा दिलेला नाही. त्यांनी पोलीस मुख्यालयात आश्रय घेतल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी सुमारे 30 हजार आंदोलक आणि सरकारमधील संघर्षात पाच जण ठार झाले; तर 45 जण जखमी झाले. देशातील स्थिती स्फोटक बनत चालली असून ङ्गशिनावात्रा हटावफ या मागणीसाठी आक्रमक झालेले सुमारे 30 हजार नागरिक पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या मगव्हर्नमेंट हाऊसफवर रविवारी चाल करून गेले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचाही वापर केला. देशातील स्थिती तणावपूर्ण असताना विरोधी नेत्यांनी सोमवारपासून एक आठवडाभर संपाची हाक दिली आहे.
सर्व सरकारी कार्यालये, टीव्ही स्टेशने, पोलीस मुख्यालय यावर कब्जा करा, अशी आवाहनाची भाषा विरोधी नेते वापरू लागल्याने थायलंडमधील स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या थायलंडमधील आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. रामखामेहेंग विद्यापीठात शनिवारी पोलिसांसोबत उडालेल्या धुमश्चक्रीत 5 ठार झाले, तर सुमारे 45 जण जखमी झाले. शिनावात्रा यांनी गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय देशहितविरोधी असून देशाची आर्थिक स्थिती ढासळत असताना त्यांचा विदेश दौर्यांवर मोठा खर्च चालू आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
सिरीयामध्ये बाशर अल असद यांच्या राजवटीपुढेही असेच देशांतर्गत बंडाळी मोडून काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तीच गत आता शिनावात्रा सरकारची झाली आहे. पंतप्रधान कार्यालयासह सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालयावर कब्जा करण्यासाठी हजारो आंदोलक सचिवालयावर धडक देतात. सरकारी यंत्रणेवर कब्जा करून कामकाज ठप्प करण्याचा त्यांचा इरादा होता. रविवारी सचिवालयाच्या दिशेने निघताच चमाई मारुशेट ब्रिगेड या दंग्यावर नियंत्रण राखणार्या पथकाने अश्रुधुराच्या नळकांड्या आंदोलकांवर फेकल्या. आंदोलकांनीही पोलिसांवर पेट्रोलबॉम्ब टाकले. काही निदर्शक थाई पीबीएस या दूरचित्रवाणी कार्यालयावर चाल करून गेले, तर दुसरा गट गृहमंत्रालयाच्या परिसरात घुसला होता.