केईएम मधील १२ महिलांची लैंगिक शोषणाची तक्रार

मुंबई – मुंबई महापालिकेतर्ङ्गे चालविल्या जाणार्‍या केईएम रुग्णालयाच्या सेंट्रल क्लिनीकल बायो केमेस्ट्री लॅबोरेटरी या विभागातील १२ महिला कर्मचार्‍यांनी एका ज्येष्ठ कर्मचार्‍याविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण होत असल्याची खळबळजनक तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या विभागाच्या प्रमुख डॉ. सुचेता दांडेकर यांच्याकडे आपला तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सदर कर्मचारी हा १८ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असून तिथे तो महिला कर्मचार्‍यांना सतत त्रास देत असतो. त्यांच्या राहण्या-बोलण्यावर आणि कपड्यांवर तो अश्‍लील टिप्पणी करत असतो. दारू पितो आणि दारूच्या नशेत कामावर येतो. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा हा प्रकार सुरू आहे.

त्याची अन्य विभागात बदलीही करण्यात आली होती. परंतु तो नव्या कामावर रूजू झाला नाही. केईएम रुग्णालयात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या संबंधातील तक्रारींचे निवेदन करण्याकरिता एक खास विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. या विभागाच्या पदाधिकार्‍यांनी आता त्याची चौकशी सुरू केली आहे.

Leave a Comment