कलम 370वर तर्कशुद्ध चर्चा हवीच – मोदी

अहमदाबाद – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार्‍या कलम 370वर राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर त्या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टीका केल्यावर मोदी यांनी आज आपला ङ्गफोकसफ बदलण्याचा प्रयत्न केला. या कलमासह काश्मिरी पंडितांच्या त्रासाबद्दल तर्कशुद्ध चर्चा व्हायलाच हवी, असे मोदी यांनी आज ट्विटरवर स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी मोदी यांच्या भूमिकेमुळे भाजपची या कलमाबद्दलची भूमिका मवाळ केल्याचा अर्थ काढणे चुकीचे होईल, असे स्पष्ट केले आहे. या मुद्द्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही मोदी यांनी केला. कलम 370 वर चर्चेचे आवाहन केल्यानंतर जनता, सोशल मीडिया आणि टीव्हीवर याप्रकरणी व्यापक चर्चा केली जात असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या काश्मिरी पंडितांच्या यातनांकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. या समुदायाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. पृथ्वीवर कुठे स्वर्ग असलाच तर तो जम्मू-काश्मीरमध्ये आहे, अशी या राज्याची महती गायली जाते. त्यामुळे, आपल्या सर्वांनी जम्मू-काश्मीरला शांतता, एकात्मता आणि विविधतेचा स्वर्ग बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील मुख्य राजकीय पक्षांनी मोदींनी कलम 370चा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सभेला संबोधित करताना मोदी यांनी या कलमावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

Leave a Comment