इशरत जहॉं प्रकरणात गुप्तचर अधिकार्‍याला अटक होणार

नवी दिल्ली – सीबीआयने २००४ साली अहमदाबादेत घडलेल्या बहुचर्चित इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणाचे पुरवणी आरोपपत्र तयार केले असून त्यानुसार या चकमकीस कारणीभूत असलेल्या इंटेलिजन्स् ब्यूरोच्या अधिकार्‍याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.

गुजरातचे माजी पोलीस उप महानिरीक्षक एन.के. अमीन हे या संबंधात सध्या अटकेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या संबंधात न्यायालयाने सीबीआयला नोटीस पाठवली असून आपले म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.

सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात इंटेलिजन्स् ब्यूरोचे विशेष संचालक राजींदर कुमार यांची भूमिका काय होती हे सविस्तर विषद केले आहे आणि त्यामुळेच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. राजींदर कुमार यांच्याशिवाय राजीव वानखेडे, एम.के. सिन्हा आणि टी. मित्तल याही अधिकार्‍यांनी या प्रकरणात काय भूमिका वठवली हेही आरोपपत्रात नमूद केलेले आहे.

सीबीआयच्या अधिकार्‍यांनी हे पुरवणी आरोपपत्र सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांच्याकडे पाठवून दिले आहे. संचालकांनी ते मान्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सादर केले जाईल. या पुरवणी आरोपपत्रात कोणत्या राजकीय नेत्यांची नावे आहेत. या संबंधी लोकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. विशेषत: ही घटना घडली तेव्हाचे गृहमंत्री अमित शहा यांचे नाव आहे की नाही याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. परंतु सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रात अमित शहा यांना गोवलेले नाही.

Leave a Comment