कीव – युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टोर यानुकोवीच यांनी युरोपीय संघ आणि युक्रेनमध्ये मुक्त व्यापार आणि दृढ राजकीय सहकार्य करार करण्यास नकार दिला आहे. रशियाशी असलेले व्यापारी संबंध तोडणे युक्रेनला परवडणारे नाही, असे सांगत यानुकोविच यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
गेल्या शुक्रवारी युक्रेन आणि युरोपीय संघात या करारावर स्वाक्षर्या होणार होत्या, पण यानुकोविच यांनी नकार दिला आणि अध्यक्षांच्या या निर्णयाने संतप्त झालेले 10 हजारांहून अधिक नागरिक सरकारी बंदी आदेश झुगारून रस्त्यावर उतरले. राजधानी कीवच्या मध्यभागी असलेल्या इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये निदर्शने करण्यास सरकारने बंदी घातली होती. तरीही पोलिसांशी झटापट करत जवळपास एक लाख लोक आंदोलनात उतरले आणि त्यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला.
क्रांतीच्या गगनभेदी घोषणांनी इंडिपेंडन्स स्क्वेअर दणाणून गेला होता. आठवडाभरापासूनच युक्रेनमध्ये थायलंडप्रमाणेच या आंदोलनाला सुरुवात झाली आहे; परंतु रविवारी आंदोलनाला झालेली गर्दी प्रचंड होती. पश्चिम युक्रेनमध्ये युरोपीय संघ समर्थकांची मोठी संख्या आहे. बहुतांश आंदोलक पश्चिम युक्रेनमधूनच आले होते. शनिवारी इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये आंदोलन करणार्या निदर्शकांवर दंगलविरोधी पोलिसांनी लाठीमार केला होता. या लाठीमारात अनेक निदर्शक जखमी झाले. काहींची डोकी फुटली. सरकारच्या या कृतीमुळे लोक भडकले आणि रविवारी ते हजारोंच्या संख्येने इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये उतरले. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून लोकांचे लोंढे चौकाच्या दिशेने येत असलेले पाहून पोलिस स्वत:च चौक सोडून गेले.