मुंबई – एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना उच्च न्यायालयाने आज अंतरिम दिलासा दिला. सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांनी पवार यांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास केलेल्या अंतरिम मनाई आदेशाला न्यायमूर्ती अनुप मोहता यांनी आज अंतरिम स्थगिती दिली.
शरद पवार यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
न्यायालयाच्या या निर्णयामुळे पवार यांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने एमसीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, मुंडे यांनी या निवडीलाच सत्र न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले आहे. सत्र न्यायाधीश शर्मा यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास मनाई केली होती. या निर्णयाविरोधात पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
ती सुनावणीसाठी दाखल करून घेताना न्यायमूर्ती अनुप मोहता यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला 17 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. सत्र न्यायालयाने निवडणूक अधिकार्यांचा निर्णय हा प्रथम दर्शनी नियमबाह्य असल्याचे मत व्यक्त करून शरद पवार यांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास 26 नोव्हेंबर रोजी अंतरिम मनाई केली होती. आठ दिवसांत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देताना सर्व प्रतिवादींना 15 दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश दिले. तसेच मुंडे यांच्या दाव्यावर नियमित सुनावणी घेऊन तीन महिन्यांत निकाली काढावा, असेही स्पष्ट केले आहे.