जयपूर – राजस्थान विधानसभेसाठी रविवारी झालेल्या मतदानात ७२.४९ टक्के मतदारांनी म्हणजे विक्रमी संख्येने मतदान केले. राजस्थानच्या इतिहासातले हे सर्वाधिक मतदान आहे. २००८ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ६६.२५ टक्के मतदान झाले होते आणि तो त्यावेळपर्यंतचा मतदानाचा विक्रम होता. यावेळी मात्र नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांच्या निवडणुका होत आहेत. परंतु चुरु मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे त्या मतदार संघातील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. काल झालेल्या मतदानामध्ये २,०८७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
कालच्या मतदानात जैसेलमेर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५.५ टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान भरतपूर जिल्ह्यात ५५ टक्के एवढे झाले. राजधानी जयपूरमध्ये ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान सर्वसाधारणत: शांततेत पार पडले असले तरी दौसा, केकरी, सवाईमाधोपूर आणि थानागाझी या ठिकाणी दोन गटात चकमकी झाल्या.