प्रतिभा पाटील यांनी केल्या भेटवस्तू परत

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती म्हणून त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचे अमरावती येथील आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या शाळेत प्रदर्शन लावल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडे त्या वस्तू परत पाठविल्या आहेत.
राष्ट्रपतीपदी असताना प्रतिभा पाटील यांना १५५ भेटवस्तू मिळाल्या. त्या सर्व वस्तू अमरावती येथील विद्या भारती शैक्षणिक मंडळाला प्रदर्शनासाठी देण्यात आल्या होत्या, असे राष्ट्रपतीभवनाकडून माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाच्या उत्तरात म्हटले आहे.

नेल्सन मंडेलाकडून प्राप्त सुवर्ण पदक आणि रौप्य पदक, चीनकडून मिळालेला गिफ्ट बॉक्स आदींसह सर्व भेटवस्तू २२ मे रोजी राष्ट्रपती भवनाकडे परत पाठविण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती भवनातील उपसंचालक (कला) यांनी या वस्तू स्वीकारल्या. यासंदर्भातील तपशील समाजसेवक सुभाष अग्रवाल यांच्या माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाला राष्ट्रपती भवनाने दिला आहे.

राष्ट्रपती भवन आणि विद्या भारती शैक्षणिक मंडळ, अमरावती यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार या संस्थेला या वस्तू देण्यात आल्या होत्या, अशी माहिती देण्यात आली. मात्र, या वस्तूंच्या वाहतुकीसाठी किती खर्च आला याविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळात नवी दिल्लीतील ब्रह्मोस केंद्रात प्रदर्शनासाठी डीआरडीओला ३६ वस्तू देण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती भवनाला या सर्व ३६ वस्तू ३ ऑक्टोबर २0१२ रोजी परत मिळाल्या आहेत.