डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-यांचा लागला सुगावा

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्याद होवून १०० दिवस लोटले आहेत. रविवारी त्यांच्या मारेक-यांचा सुगावा लागला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अंतिम टप्प्यात आला असून लवकरच निष्कर्ष समोर येतील, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिल्याचा दावाही केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी दाभोलकर यांच्या कुटुंबियांनी नवी दिल्लीत आपली भेट घेऊन त्यांचे म्हणने मांडले होते. त्यानंतर राज्य सरकारशी चर्चा केली. त्यावेळी मारेक-याबाबत पोलिसांना काही सुगावा लागला आहे, असे आपल्याला सांगण्यात आले, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान दाभोलकरांचे दोन मारेकरी हे पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे सुमारे १०० दिवसांनंतर पोलिसांना दाभोलकरांच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश आल्याचे दिसत आहे. बनावट शस्त्रास्त्रप्रकरणी मुंब्र्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांकडील पिस्तुल आणि दाभोलकरांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या जुळत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आल्याचे समजते.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट रोजी गोळ्या झाडून करण्यात आली होती. हत्येच्या तीन महिन्यानंतरही पोलिसांच्या हाती काही पुरावे न लागल्याने त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र आता गृहमंत्र्यांनी मारेक-यांचा सुगावा लागल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment