काचबिंदूपासून सावध

वयाच्या चाळिशीनंतर कोणत्याही क्षणी होण्याची संभावना असलेले डोळ्याचे दोन विकार म्हणजे मोतीबिंदू आणि काचबिंदू. सध्या मोतीबिंदूवर काही सेकंदात शस्त्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर्स आहेत आणि मोतीबिंदू हा विकार ङ्गार धोकादायक नाही हे लक्षात आलेले आहे. त्यामानाने काचबिंदू मात्र त्रासदायक असतो. गेला पूर्ण आठवडा जगात काचबिंदू सप्ताह पाळण्यात आला. नेत्र तज्ज्ञांच्या मते काचबिंदू हा धोकादायक असतोच, परंतु त्याचे वेळीच निदान झाले तर तो दुरुस्त होऊ शकतो. म्हणून चाळिशी नंतर काचबिंदूच्या बाबतीत डोळ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. ती न केल्यास दृष्टी जाण्याची शक्यता असते.

जगभरामध्ये १२.८ टक्के लोकांना काचबिंदूचा त्रास आहे. भारतामध्ये या विकाराने त्रस्त असणार्‍यांची संख्या १ कोटी १२ लाख एवढी आहे आणि त्यात वयस्कर लोकांची संख्या मोठी आहे. काचबिंदूचे नेमके कारण अजूनही माहीत झालेले नाही. परंतु लघुदृष्टी आणि डोळ्याला जखम होणे यातून तो विकसित होतो असे मानले जाते. निरनिराळ्या शारीरिक व्याधींसाठी स्टेरॉईडस्चा सातत्याने वापर करणेही काचबिंदूला निमंत्रण देणारे ठरत असते.

सतत डोके दुखणे, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि आनुवंशिकता याही कारणांमुळे काचबिंदू होऊ शकतो. काचबिंदूच्या संबंधात लोकांचे प्रबोधन करण्यासाठी एक आठवडा पाळावा लागला. कारण काचबिंदू झालेल्या रुग्णांच्या पाहणीनंतर असे आढळले आहे की, ९० टक्के रुग्णांच्या बाबतीत काचबिंदूचे निदान वेळेवर झालेले नसते. त्यामुळे काचबिंदू विकोपास जातो. अर्थात काचबिंदूचे निदान वेळेवर न होण्यास पूर्णपणे रुग्ण जबाबदार नाही.

काचबिंदूच्या प्राथमिक अवस्थेत त्याची कसलीच लक्षणे दिसत नाहीत आणि ती दिसत नसल्यामुळे काचबिंदू झाला आहे हे कळत नाही आणि ते न कळल्यामुळे त्यावर उपचार करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. म्हणून कसलाही त्रास होवो की न होवो चाळिशीनंतर काचबिंदूच्या निमित्ताने तपासणी होणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या विकारासाठी कधी कधी आयड्रॉप्स् वापरले जातात. ते आयड्रॉप्स् हलक्या दर्जाचे असतील तर त्यामुळे काचबिंदू होऊ शकतो आणि असा काचबिंदू १५ वर्षांच्या आतील मुलांना सुद्धा होण्याची शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment