त्याची जागा जेलमध्येच

सध्या सगळ्या देशाच्या डोळ्यात खुपणारा बलात्कारी पत्रकार बेल मिळविण्यात यशस्वी होतो की अपयशी होऊन जेलमध्ये जातो याविषयी विलक्षण औत्सुक्य होते. त्याच्या बलात्काराच्या प्रकरणाचा गौप्यस्ङ्गोट झाल्यापासून त्याच्या अटकेच्या संबंधाने ज्या ज्या नाट्यमय घटना घडत होत्या त्यांच्यामुळे तर हे औत्सुक्य ङ्गारच ताणले गेले होते. शेवटी आता ती उत्सुकता संपली आहे आणि बेल (जामीन)साठी धडपड करणारा हा प्रतिष्ठीत संपादक शेवटी जेलमध्ये गेला आहे. तो आता बरेच दिवस आत खितपत पडेल. त्याच्या या भानगडीच्या निमित्ताने त्याच्या संपत्तीच्या भानगडी जर उघड झाल्या तर आणि त्याच्या अवैध संपत्तीचे उत्खनन सुरू झाले तर तो ङ्गार प्रदीर्घ काळ आतच राहणार आहे. बलात्काराचा खटला झाल्यास जन्मठेप अटळ आहेच पण अवैध संपत्तीच्या संबंधातही त्याला अनेक शिक्षा भोगाव्या लागतील. त्यांनी आपली अटक तूर्ततरी टळावी म्हणून बरीच धडपड केली पण ती व्यर्थ गेली. शेवटी त्याला गजाआड जावेच लागले. बलात्काराच्या प्रकरणात आपल्यावर खटला चालणार हे त्यांना कळून चुकले होते. कारण त्यांनीच बलात्काराची कबुली दिलेली होती. कायदा मोठा कठोर असतो.

बलात्काराच्या प्रकरणात ताबडतोब अटक होतेच. या गुन्ह्याच्या बाबतीत न्यायालयेही कठोर झाली आहेत आणि जनक्षोभाचा विचार करून अशा आरोपींना दयामाया दाखवण्याच्या मनःस्थितीत न्यायालये नाहीत. ही गोष्ट सर्वांनाच कळते. पण तरुण तेजपाल यांना कसल्यातरी चमत्काराची अपेक्षा असावी. असा एखादा चमत्कार घडून आपल्याला अटक टाळता येईल अशी धडपड त्यांनी केली. ती करताना त्यांनी प्रामाणिकपणाचा आव आणला. आपण जे केले ते आपल्याला मान्यच आहे. आपण ते प्रामाणिकपणे मान्य करू अशी प्रांजळपणाची भूमिका घेतली आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली. असा समजूतदारपणा दाखवल्यास आपली अटक टळेल अशी आशा त्यांना वाटत होती परंतु या प्रांजळपणाच्या निमित्ताने ते आपला गुन्हा कबूल करत गेले आणि स्वतःच स्वतःच्या विरुध्द पुरावे देत गेले आणि त्याचमुळे त्यांची अटक वरचेवर अटळ ठरत गेली. काल रात्री गोव्यातील पणजीच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शेवटी त्यांचा जामीन नाकारला आणि त्यांना अटक झाली. त्याची राष्ट्रीय ख्याती आणि त्याला असलेले राजकीय पाठबळ यामुळे त्याने केलेला गुन्हा हा सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरला होता. या संपादकाने आपल्या मुलीच्या वयाच्या पत्रकार महिलेवर ७ आणि ८ नोव्हेंबर असे दोन दिवस लैंगिक अत्याचार केले होते.

त्यामुळे विलक्षण मानसिक घुसमट झालेल्या या तरुणीने २२ नोव्हेंबरला आपली तक्रार दाखल केली आणि तेव्हापासून तरुण तेजपाल यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली. दरम्यानच्या काळात तरुण तेजपाल यांनी एका बाजूला गुन्हाही कबूल केला, त्या मुलीला एसएमएस पाठवून तिची क्षमाही मागितली. जाहीरपणे गुन्ह्याची कबुली देऊन प्रायश्‍चित्त घेणार असल्याचे घोषित केले. शिवाय त्यांनी एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये केलेला हा उद्योग कॅमेर्‍यात बंद झाला आहे. हे सारे पुरावे तरुण तेजपाल यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, कारण अलीकडेच झालेल्या नव्या कायद्यामुळे तशी तरतूद झालेली आहे. तरुण तेजपाल यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या सहकारी महिला पत्रकारावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. ती केवळ त्यांच्या मुलीच्या वयाचीच आहे असे नाही तर मुलीची मैत्रीण सुद्धा आहे. तिच्यावर तरुण तेजपालने जबरदस्ती केली तेव्हा तिने ही हकीकत आपली मैत्रीण असलेल्या तेजपाल याच्या मुलीला सुद्धा कळवली होती. हे तेजपालला समजले तेव्हा त्याने एसएमएस पाठवून या मुलीची माङ्गी मागितली आणि आपण दारूच्या नशेत तसे करून बसलो असे कबूल केले.

सार्‍या जगाला नीतीमत्तेचे धडे शिकविणारा पत्रकार दारू पितो हीच गोष्ट मोठी विसंगत आहे. परंतु या नशेत आपल्या सहकारी महिलेवर एवढेच नव्हे तर आपल्या मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करतो हीही मोठी विसंगती आहे. सार्‍या जगातला भ्रष्टाचार नष्ट करायची मक्तेदारी आपल्याकडेच असल्याचा आव आणणारे असले बोगस पत्रकार किती चारित्र्यहीन असू शकतात हे सार्‍या जगाला बघायला मिळाले. तरुण तेजपाल हा एकटाच नाही तर देशातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईन दैनिकांमधून सातत्याने ढोंगीपणा करणारे असे अनेक तेजपाल आहेत. त्या सर्वांनाही उघडे पाडले पाहिजे. अशा पत्रकारांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सुपार्‍याच घ्यायला सुरूवात केली आणि सुपारी पत्रकारितेच्या मार्गाने अमाप संपत्ती मिळवायला सुरूवात केली आहे. असे काळ्या मार्गाने कमवलेली संपत्ती माणसाला गप्प बसू देत नाही. त्याला काळ्या धंद्याकडे ओढत असते आणि पापाचा पैसा त्याला अधःपतनाच्या गर्तेत नेऊन सोडत असतो. तरुण तेजपाल हा अशा पापाच्या पैशातूनच गोव्यामध्ये अशाच चंगीभंगी लोकांसाठी एक क्लब काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यातूनच तो अडचणीत येत गेला. माणसाला जगायला पैसा लागतो. पण त्याच्या जीवनावर पैशाचा प्रभाव पडता कामा नये हे त्याला कळत नाही.

Leave a Comment