महिलांचा मुख्य प्रश्‍न : आरोग्य

महिलांची सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा प्रश्‍न असल्याचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. हा तर त्यांचा प्रश्‍न आहेच, पण त्यांचे आरोग्य हा सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. भारतात सध्या कुपोषित बालक आणि अशा कुपोषित बालकांचे अवेळी होणारे मृत्यू ही मोठी गंभीर समस्या मानली जात आहे आणि त्यावर भरपूर चर्चा होत आहे. परंतु महिलांमधील कुपोषण ही काही कमी गंभीर समस्या आहे असे नाही.

भारतातल्या दर दोन महिलांमागे एक महिला कसल्या ना कसल्या अशक्तपणाच्या तक्रारीने ग्रस्त आहेत. ३५ टक्के महिला गंभीर स्वरूपाच्या अशक्त आहेत तर १५ टक्के महिलांंना कमी गंभीर स्वरूपाच्या अशक्ततेचा त्रास आहे. महिलांसाठी पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या-मध्ये ही समस्या निर्माण झाली असल्याचे मत काही महिला डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. महिलांच्या जीवनात आरोग्य हा शेवटच्या प्राधान्याचा विषय असतो. लहान-मोठ्या आजारासाठी बायकांनी डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते, असे सरसकट मानले जाते. त्यामुळे त्यांचे हे लहान-मोठे आजार बघता बघता मोठे होतात आणि गंभीर स्वरूप धारण करतात.

विशेषत: कर्करोगाच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात येते. कितीही त्रास होत असला तरी तो सहन केला पाहिजे, ही महिलांची मानसिकता असल्यामुळे त्या कर्करोगाच्या पहिल्या अवस्थेतील त्रास तसाच अंगावर काढतात आणि जेव्हा त्या तपासण्यासाठी म्हणून डॉक्टरकडे जातात तेव्हा कर्करोग पुढच्या अवस्थेत गेलेला असतो. भारतात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. त्यामागे त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष हेच कारण आहे. भारतातील महिला विशेषत्वाने कर्करोगाला बळी पडण्याची शक्यता त्यामुळेच आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या संबंधात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून केवळ महिलांच्या आरोग्याला वाहिलेल्या दोन संकेतस्थळांचा प्रारंभ केला आहे. महिला आणि डॉक्टर यांच्यात अंतर पडलेले आहे आणि ते अंतर कमी करणे आवश्यक झाले आहे. या दोन संकेतस्थळांमुळे ते अंतर कमी होईल आणि महिलांना फार वेळ खर्च न करता डॉक्टरांशी घरात बसून संपर्क साधता येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment