पप्पू कलानी दोषी, आज शिक्षेची सुनावणी

कल्याण : इंदर भटीजा यांच्या २३ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी माजी आमदार आणि उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक पप्पू कलानीना कल्याण सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यासह अन्य तिघा जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. न्यायाधीश राजेश्वरी बापट यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी झाली,

पप्पू कलानी याला या खून खटल्यात कोर्टाने १२० ब अंतर्गत खुनाचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. तसेच बच्ची पांडे, बाबा ग्राबियाल, अर्शद ताहीर हुसेन यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. तर डॉ रामसिंघानी आणि रिचर्डसन फर्नांडीस यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

२७ फेब्रुवारी १९९० रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर सायंकाळी पिंटो पार्क रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या घनश्याम भटीजा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही हत्या पप्पू कलानी यांनीच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू आणि एकमेव प्रत्यक्षदर्शी इंदर भटीजा यांनी करत आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. मात्र २८ एप्रिल १९९० रोजी सकाळी इंदर कामावर जात असताना अंगरक्षकाचीच बंदूक काढून घेत इंदरला गोळ्या घालण्यात आल्या.

याप्रकरणी मुख्य आरोपी माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह बच्ची पांडे, बाबा ग्राबियाल, श्याम, अली किशोर, मोहम्मद अरसद आणि डॉ. नरेंद्र रामसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यातील सर्व आरोपी सध्या जामिनावर होते. ३० वर्षांपासून या गुन्ह्याची चालढकल होत असल्यामुळे अखेर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत ३० नोव्हेंबरपूर्वी हा खटला निकाली लावण्याचे आदेश दिले होते. या खटल्याचा निकाल शुक्रवारी देण्यात आला.

न्यायाधीश राजेश्वरी बापट यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी पार पडली, या निकालाने उल्हासनगर शहरात खळबळ उडाली असून आता शहरात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, पप्पू कलानी याला काय शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे