ते वादग्रस्त न्यायमूर्ती ए. के. गांगुली

नवी दिल्ली : एका शिकावू वकील महिलेने गैरवर्तनाचा आरोप केलेले न्यायमूर्ती दुसरे तिसरे कोणी नसून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.के.गांगुली हेच आहेत, असे या आरोपाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने जाहीर केले आहे. या संबंधांतील पीडित महिलेने आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाची माहिती देताना न्यायमूर्तीचे नाव जाहीर केले नव्हते परंतु सदर न्यायमूर्ती नुकतेच निवृत्त झाले आहेत असे म्हटले होते आणि त्यावरून संबंधित लोकांनी ते वादग्रस्त न्यायमूर्ती गांगुलीच असावेत असा अंदाज व्यक्त करायला सुरूवात केली होती.

अशा या नाजूक प्रकरणात न्यायमूर्ती गांगुली यांचे नाव घेण्याचे साहस कोणी करू शकत नव्हते. कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. परंतु चौकशी समितीने मात्र त्यांचे नाव जाहीर केले आहे. न्यायमूर्ती गांगुली हे नुकतेच निवृत्त होऊन पश्‍चिम बंगालच्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले आहेत.

स्वतः न्यायमूर्ती गांगुली यांनी आपल्या नावाची ही घोषणा ऐकताच आपल्याला मोठा धक्का बसल्याचे म्हटले. हा अतीशय हादरवून टाकणारा आरोप आहे. आपण हा आरोप नाकारत आहोत. आपल्याला काही विशिष्ट परिस्थितीचा बळी बनवले जात आहे, असे गांगुली म्हणाले. एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना या संबंधात काही प्रश्‍न विचारले. पण त्यांनी या प्रश्‍नाची उत्तरे देण्यास नकार दिला.

Leave a Comment