गाडीचे वायपर मोजतील पाऊस

जीपीएस सिस्टीम असलेल्या चालत्या गाड्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्याची अनोखी कल्पना संशोधकांनी शोधली आहे. अतिवृष्टी, कमी वृष्टी अथवा पूरस्थितीचे निदान वेधशाळा देत असलेल्या अंदाजानुसार केले जात असले तरी पाऊस मोजताना तो सगळीकडे सारखा पडत नसतो. कांही ठिकाणी मुसळधार असते तर कांही ठिकाणी बारीक भुरभुर होत असते. अशा वेळी ठोक अंदाज देणे इतकेच हाती राहते. मात्र एकाचवेळी अनेक ठिकाणी पडत असलेल्या पावसाचे प्रमाण खात्रीलायकरित्या समजू शकले तर पूरस्थितीचे अंदाज देणे अधिक सोयीचे होईल असे लक्षात आल्यानंतर संशोधकांनी चालत्या गाड्यांचा वापर करता येईल काय याचा अभ्यास केला.

या प्रोजेक्टचे लिडर उवे हर्बलंड हे हनोव्हर जर्मनी येथील विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनांत असे दिसले की कारला जे वायपर बसविलेले असतात त्याच्या सहाय्याने पाऊस मोजणे शक्य आहे. या वायपर वर पाऊस यंत्र बसविले गेले तर तेथे पडत असलेला पाऊस सहज मोजता येतो. पाऊस यंत्रातला पाऊस स्प्रिकल होऊन वायपरवर येतो आणि वायपर किती वेगाने फिरतात यावर पाऊस ठरविता येतो. आजकाल मॉर्डन कारला असलेले ऑप्टिकल सेन्सरसहचे वायपर तर या कामी अधिक अचूक पाऊस मोजू शकतात. विंडशिल्डवर पडणारे पाणी किती वेगाने दूर सारले जाते त्यावरून हे प्रमाण समजू शकते. हा प्रयोग पैसे वाचविण्यासाठी नसून अनेक ठिकाणचे पाऊसमान समजावे यासाठी केला गेला आहे.

Leave a Comment