सोनिया गांधी : प्रेरणादायी नेतृत्व

कोलकाता : कॉंग्रेस पक्षाची लोकप्रियता वेगाने घटत असली तरी व्यक्तीशः सोनिया गांधी या मात्र भारतातल्या महिलांसाठी सर्वाधिक लोकप्रिय प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पुढे आल्या आहेत. करीअर आणि कुटुंब यांच्यातील समतोल साधण्याच्या बाबतीत सोनिया गांधी सर्वाधिक आदर्श महिला आहेत, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे. एका सर्वेक्षणामध्ये हे मत व्यक्त झाले आहे.

शादी डॉट कॉम या संकेत स्थळाने भारतातल्या महिलांमध्ये हे सर्वेक्षण केले. तेव्हा ३६.२ टक्के महिलांनी सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून सोनिया गांधी यांच्या नावाला पसंती दिली तर त्यांच्या खालोखाल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सुषमा स्वराज यांच्या नावाला ३३.६ टक्के मतदार महिलांनी पसंती दिली. ५ हजार १०० महिलांची मते आजमावली गेली.

उद्योगपती महिलांमध्ये रिलायन्सच्या नीता अंबानी यांना पहिल्या क्रमांकाची तर किरण मुजुमदार यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. आयसीआयसीय बँकेच्या चंदा कोचर तसेच ऍक्सीस बँकेच्या शिखा शर्मा यांनाही उल्लेखनीय मते मिळाली. सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांच्याबरोबरच मेरी कोम या खेळाडूंनाही चांगली मते मिळाली.

चित्रपट सृष्टीतील करिअर आणि संसार या दोन्हीतला समतोल उत्तम साधणार्‍या कलाकार महिला म्हणून शाहरूख खानची पत्नी गौरी खान, ऐश्‍वर्या रॉय, माधुरी दीक्षित आणि काजोल यांना पसंती दिली गेली. भारतातल्या महिला विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांकडून सतत प्रेरणा घेत असतात, असेही या सर्वेक्षणात आढळले.

Leave a Comment