पुणे – येत्या चार डिसेंबरपासून लोकपाल बिलासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन छेडणार आहेत. अण्णांचे हे चौथे मोठे आंदोलन आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे सरकार नेहमीच अडचणीत आले आहे आणि यामुळेच अण्णांना अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. आजपर्यंत केवळ महाराष्ट्रातच अण्णांना शत्रू होते मात्र आता देशभर अण्णांनी केलेले प्रवास, सरकार विरोधात केलेले आरोप यामुळे देशभरातच अण्णांना शत्रू निर्माण झाले असल्याचे सांगितले जात आहे.
अण्णा या संदर्भात म्हणाले की मला आजपर्यंत केवळ महाराष्ट्रातूनच ठार करण्याच्या धमक्या येत होत्या. आता यूपीतूनही अशा धमक्या येत आहेत. महाराष्ट्रात २००३ साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा तर त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच ३० लाख रूपयांची सुपारी मला ठार करण्यासाठी दिली होती मात्र या शूटरने मला सोडले आणि सहकार्याची हत्या केली. अर्थात मी असल्या प्रकारांना घाबरत नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणारच. लोकपाल बिल संमत होईपर्यंत मरणार नाही. अर्थात माझी संघटना कधीच निवडणुका लढविणार नाही मात्र लोकांनी योग्य उमेदवार निवडून द्यावेत यासाठी जनजागृती करेल. जो पर्यंत पंतप्रधानांची निवड करण्याचा अधिकार जनतेला मिळत नाही तोपर्यंत या देशाचे भले होणे अवघड आहे.