मुक्तता झाली पण प्रश्‍न कायम

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेन्द्र सरस्वती यांची खुनाच्या आरोपातून सुटका झाली याचा अनेकांना आनंदच झाला असणार पण तरीही काही प्रश्‍न शिल्लक राहतात. आजवर एवढे शंकराचार्य होऊन गेले पण त्यापैकी कोणावरही खुनाचा आरोप आल्याची इतिहासात नोंद नाही मग या शंकराचार्यांवर असा आरोप तरी का यावा ? लोकांना धर्माची तत्त्वे सांगणारांनी आणि नीतीमत्तेची शिकवण देणारांनी स्वत: शुद्ध तर राहिलेच पाहिजे पण जिथे आपले अध:पतन होण्याची दूरान्वयानेही शक्यता आहे अशा व्यवहारापासून दूर राहिले पाहिजे. किंबहुना त्यांनी सामान्य माणसाच्या या विश्‍वापासून अलिप्त राहिले पाहिजे पण हे पथ्य न पाळल्यास आरोप येतात आणि ङ्गरपट होते. जशी स्वामी जयेन्द्र सरस्वती यांची झाली आहे. भारतामध्ये संन्याशांची आणि संतांची प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेत जे संत, साधू, संन्याशी खरोखर संन्यस्त वृत्तीने राहिले तेच आपल्या परंपरेत पूजनीय आणि वंदनीय ठरले आहेत. मात्र आता अनेक साधू आणि संन्याशी प्रचंड मोठ्या मालमत्ता जमा करण्याच्या मागे लागले आहेत. काही धर्माचार्यांना संपत्ती कमवण्याच्या बाबतीत भारत देश कमी वाटला म्हणून की काय त्यांनी परदेशांमध्ये मालमत्ता जमा करायला सुरूवात केली आहे. पूर्वीही सगळे साधू असे होतेच असे नाही पण त्याही वातावरणात काही साधू आणि संन्याशी खरोखरच अकिंचन अवस्थेत जगत होते.

ज्यांनी पैसा कमवण्याचा प्रयत्न केला त्यांना अशा भानगडींना तोंड द्यावे लागले असे इतिहास सांगतो. आज अनेकमंदिरांमध्ये पैशांची आणि सोन्याची लयलूट केली जात आहे. परंतु आपण ज्यांना धर्माचे प्रवर्तक मानतो त्या शंकराचार्यांची लंगोटी आणि कमंडलू या पलिकडे कसलीही संपत्ती नव्हती. शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात तर आज कशी पैशाची उधळपट्टी चाललेली आहे याच्या बातम्या आपण वाचत असतो. पण ज्यांच्या मूर्तीच्या भोवती अर्थकारण निर्माण होत आहे. त्या साईबाबांना त्यांच्या हयातीत अनेकवेळा उपासमार सहन करावी लागली आहे. आद्य शंकराचार्यांच्या मठातही असे अर्थकारण बळावले आहे आणि त्यातूनच एका मठाच्या शंकराचार्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागले. त्यांच्या सुदैवाने या आरोपातून ते आता मुक्त झाले आहेत. परंतु त्यांना आरोपी केले गेले ही सुध्दा आद्य शंकराचार्यांच्या प्रतिमेला काळीमा लावणारी गोष्ट होती. ते निर्दोष सुटले आहेत याचा कोणत्याही हिंदू व्यक्तीला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी ते धर्माचे सर्वोच्च पीठ आहे. अशा पीठावर बसलेले संन्याशी हे ऐहिक जीवनापासून दूर असतात. ऐहिक जीवनातले व्यवहारच त्यांना वर्ज्य असतात. मग त्यांच्यावर खुनासारखा आरोप येण्याची शक्यताच नसते.

या शंकराचार्यांवर तो आला आणि त्यांच्या सुदैवाने बहुसंख्य साक्षीदार उलटले आणि आचार्य निर्दोष सुटले. एकेकाळी या मठाला इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, एम.जी. रामचंद्रन, आर. वेंकटरामन अशा कितीतरी थोरनेत्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आचार्य जयेंद्र सरस्वतींच्या आधी या पीठाचे प्रमुख म्हणून परमाचार्य चंद्रशेखर सरस्वती हे काम पहात होते. स्वामी जयेंद्र सरस्वती यांनी ६९ वे शंकराचार्य म्हणून या पीठाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर या मठाचे आर्थिक व्यवहार वाढत चालले. एक वेळ अशी होती की या मठाकडे पत्र व्यवहारासारख्या सामान्य कामासाठीही पैसे उपलब्ध नसत. परंतु नंतर मात्र मठाला आर्थिक सुबत्ता यायला लागली आणि आर्थिक व्यवहार वाढत चालले की त्या व्यवहारासोबत येणारे प्रश्‍नही निर्माण व्हायला लागले. त्यातून काही अतर्क्य गोष्टी घडायला लागल्या. १९८७ साली जयेंद्र सरस्वती स्वामी अचानकपणे बेपत्ता झाले. ते का बेपत्ता झाले हे शेवटपर्यत कळले नाही. मात्र त्यांच्या शिष्यांनी कर्नाटकातून शोधून आणले. मठाचे व्यवहार कसे चालावेत याबाबत पीठावरील शंकराचार्य आणि नामनिर्देशित आगामी शंकराचार्य यांच्यातले वाद बरेच उघड्यावर यायला लागले.

स्वामी चंद्रशेखरानंद सरस्वती यांच्या निधनानंतर १९९४ साली तांबारम येथे धर्मार्थ रुग्णालय सुरू केले आणि त्यानंतर एकामागे एक रुग्णालय सुरू करून ही संख्या ४४ वर नेली. शिवाय कांचीपुरम् येथे एक अभिमत विद्यापीठ सुरू केले. मठांच्या आणि मंदिरांच्या मालमत्ता हा सध्या चर्चेचा विषय आहेच पण शंकराचार्यांच्या मठाने करोडो रुपयांची मालमत्ता जमा करावी ही गोष्ट मठाच्या अनुयायांना विसंगत वाटते. मालमत्ता वाढत जात असताना याबाबत लोकांत चर्चा होत होती. त्यामुळे शंकराचार्यांवर खुनाचा आरोप येऊ शकला. आता ते निर्दोष सुटले असले तरी मठाचे ते पावित्र्य पुन्हा प्रस्थापित करणे त्यांना अवघड जाणार आहे. निर्दोष सुटले असले तरी या शंकराचार्यांची आणि मठाची प्रतिष्ठा मलीन झाली आहे. मठाच्या आचार्यांनी निरपेक्ष भावनेने काम करून, पैशापासून दूर राहून आणि अतीशय अलिप्त भावनेने केवळ धर्माचेच काम करावे तरच या मठाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. आसाराम बापूसारखे बनावट संत आणि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मठातले शंकराचार्य यामध्ये ङ्गरक असतो आणि तो असलाच पाहिजे. आता तरी या शंकराचार्यांनी संन्यस्त वृत्तीचा आदर्श घालून दिला पाहिजे. सामान्य माणूस जिथे त्याग आणि साधेपणा आहे तिथेच मान तुकवीत असतो

Leave a Comment