आशिया चषकासाठी विजय झोल कर्णधार

नवी दिल्ली- आगामी काळात होत असलेल्या एसीसी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र रणजी संघाचा युवा खेळाडू आणि जालन्याचा गुणवंत फलंदाज विजय झोलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. हा संघ १९ वर्षांखालील खेळाडूंचा असणार आहे या स्पर्धेला पुढील महिन्यापपासून सुरूवात होणार आहे.

१९ वर्षांखालील खेळाडूंच्या या संघाचा केरळचा यष्टिरक्षक संजू विश्वनाथ उपकर्णधार असणार आहे. ‘ज्युनियर निवड समितीची नवी दिल्लीत २७ नोव्हेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत अंडर-१९ आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. ही स्पर्धा यूएई येथे होणार आहे,’ असे बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

आगामी काळात होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. अ गटात भारताशिवाय पाकिस्तान, यूएई, नेपाळ यांचा समावेश आहे. ब गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मलेशियाचा समावेश आहे.

नाशिक येथे २०११ साली झालेल्या सामन्यात नाबाद ४५१ धावा केल्या पासून विजय झोल प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. यानंतर त्याने गेल्याप वर्षी झालेल्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या वर्ल्डकपमध्ये २५.१६ च्या सरासरीने १५१ धावा काढल्या होत्या. यानंतर झोलने या वर्षी रणजी पदार्पणात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला.

भारताचा १९ वर्षांखालील संघ पुढीलप्रमाणे – विजय झोल (कर्णधार), संजू विश्वनाथ, अखिल हेरवाडकर, अंकुश बैस, रिकी भुई, र्शेयस अय्यर, सरफराज खान, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, आमिर गनी, करण काला, सी. व्ही. मिलिंद, अवेश खान, ऋषी आरोठे व मोनूकुमार सिंग.