बेळगाव – कर्नाटक सरकारची शादी भाग्य योजना केवळ मुस्लिमांसाठी नसावी तर ती सर्व समाजघटकांतल्या गरीब लोकांसाठी असावी अशी मागणी करून विधानसभेच्या सौधात धरण्यावर बसलेले माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी दोन दिवस आणि दोन रात्री सुरू राहिलेले आपले धरणे काल विधानसभेसमोर झालेल्या शेतकर्याच्या आत्महत्येच्या प्रकारानंतर संपवले.
सरकारने शादी भाग्य ही योजना जाहीर केली आहे. तिच्यात मुस्लिम समाजातल्या गरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी सरकार तर्ङ्गे ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गरीब लोक केवळ मुस्लिम समाजातच आहेत असे नाही. सर्व समाजात आहेत आणि त्यांच्याही मुलींच्या विवाहात अडचणी येत असतात तेव्हा केवळ मतांवर डोळा ठेवून सरकारने ही योजना मुस्लिम समाजासाठीच न आखता सर्व समाज घटकांनाही लागू करावी अशी मागणी करून येडीयुरप्पा धरण्यावर बसले होते.
शेतकर्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत येडीयुरप्पा यांनी आपले धरणे संपवले आणि आता आपण शेतकर्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी बेळगावातल्या दोन दिवसांसह २६ दिवस हे धरणे धरले होते. पूर्वी ते बंगळूरमध्ये सुरू होते.