बीडमध्ये कार आणि ट्रकच्या धडकेत पाच जण ठार

बीड – पाटोदाजवळ आज स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

बुधवारी सकाळी साडे सहा वाजता इचलकरंजीचे भंडारे कुटुंबीय लातूरहून नगरकडे स्विफ्ट कार मधून जात होते. यावेळी समोरुन येणार्‍या ट्रकने कारला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ही कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आणि यात कार मधले पाचही जण जागीच ठार झाले.

पाटोदाजवळ मंगेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. पद्मावती भंडारे (वय 48 वर्ष), सागर भंडारे (वय 28 वर्ष), पायल भंडारे (वय 24 वर्ष), साई भंडारे (वय दीड वर्ष), अनिता घुगे (वय 50 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. रोहन घुगे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.