चेंडूची दिशा व टप्पयावर भर देणार- उमेश यादव

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर गेलेल्या उमेश यादवची दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे सध्या तो भलताच खूश आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी तयारी म्हणून तत्पूर्वी उमेश यादव मुंबईविरुद्धच्या रणजी लढतीत विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यात चेंडूची दिशा आणि टप्पा यांच्यावर भर देणार असल्याचे उमेशने यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उमेश म्हणाला, ‘मी खूप विचार करत नाही. चेंडूची दिशा आणि टप्पा यांच्यावर नियंत्रण राखणे हेच माझे आगामी काळात उद्दिष्ट राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेत वातावरण आणि खेळपट्टय़ा वेगळ्या असणार आहेत. उजव्या यष्टीवर मारा करण्याचा माझा प्रयत्न असेल. झहीर खानची अनेक दिवसांनंतर भेट झाली. माझ्या तंदुरुस्तीविषयी त्याने चौकशी केली. चेंडूची दिशा आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. वेगवान गोलंदाजाला सामन्याचा सराव होणे आवश्यक असते. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी मिळते. मुंबईत खेळण्याचा दक्षिण आफ्रिकेत फायदाच होईल.’

दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात माझा अंतिम संघात समावेश व्हावा, यासाठी मी प्रार्थना करत आहे. कोणाचीही निवड होऊ शकते. कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळवू शकतील असे फिरकीपटू आपल्या संघात आहेत. मला अंतिम संघात स्थान मिळाल्यास सर्वोत्तम प्रदर्शनाचा प्रयत्न असेल. परंतु माझ्या समावेशापेक्षा संघाचे संतुलन महत्त्वाचे आहे, असेही यादवने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment