गुजरातेत जमिनीला आले सोन्याचे मोल

अहमदाबाद – गुजरातेतल्या सानंद या औद्योगिक वसाहतीच्या परिसरातल्या खोराज या गावातली जमीन गुजरात राज्य औद्योगिक विकास महामंडळाने आकर्षक मोबदला देऊन खरेदी केल्याने त्या गावातल्या शेतकर्‍यांना करोडो रुपये मिळणार आहेत. एका चौरस मीटरला ११५० रुपये असा भाव देण्यात आला आहे. या गावातल्या १५०० हेक्टर जमिनीपैकी १३०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून तिच्या मोबदल्यापोटी १२०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका हेक्टरला साधारणत: एक कोटी रुपयांचा मोबदला मिळत आहे.

खोराज हे गाव साणंदपासून १७ किलो मीटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या सहा हजार आहे. या गावात एकदम एवढा पैसा येणार असल्याने शेतकरी खुष आहेत. त्यातल्या काही शेतकर्‍यांना तीन तीन कोटी रुपये मिळणार आहेत. २०० कोटी रुपयांचे वाटपही झाले आहे. बाकीचे पैसे या महिन्यात वाटप होतील. अनेकांंनी आताच आलीशान मोटार कार खरेदी करायला सुरूवात केली आहे. अनेकांनी राजेशाही बंगले बांधण्याची तयारी केली आहे.

बहुसंख्य शेतकरी मात्र आलेल्या पैशातून अन्यत्र जमीन खरेदी करून तिच्यात पैसा गुंतवण्याचा विचार करीत आहेत कारण त्यांना जमिनीतूनच गुंतवणुकीचा चांगला मोबदला मिळण्याची शक्यता वाटत आहे. गावचे सरपंच पद एका महिलेकडे आहे आणि त्यांनी लोकांना हा पैसा असा चैनीवर खर्च न करता जमिनीत गुंतवावा असा सल्ला दिला आहे.

Leave a Comment