केंद्रीय मंत्री तरूण तेजपाल यांची पाठराखण करत आहेत’

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनीही तहलका प्रकरणात प्रतिक्रिया देताना, तहलकाचे संस्थापक आणि माजी संपादक तरूण तेजपाल यांची पाठराखण एक मन्त्री करत असल्याचा आरोप केला आहे. सुषमा स्वराज यांनी हा आरोप आपल्या ट्वीटमधून केला आहे.

यापूर्वी तरूण तेजपाल यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात आपल्याविरूद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. गोव्याचे मुख्यमंत्री या प्रकरणात खूप जास्त रस घेत आहेत. एकूणच भाजप या सर्व प्रकरणामागे असल्याचं सूचित करून त्यांनी तहलकाने भाजप विरूद्ध केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा बदला घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आज पहिल्यांदाच सुषमा स्वराज यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने ट्वीटरवरून तहलका प्रकरणी प्रतिक्रिया देताना एका केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एक केंद्रीय मंत्री, जे तहलकाचे संस्थापक तसंच पालकही आहेत, ते आता तरूण तेजपाल यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी ढाल बनत असल्याचं सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही.

Leave a Comment