नवीन वर्षात मुंबईत घरे स्वस्त

मुंबई – पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच मुंबईतील घरांच्या किमती उतरतील असा अंदाज रियल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म नाईट फ्रँकने व्यक्त केला आहे. मुंबईत सध्या सुमारे तीन लाख नवीन घरे बांधली जात आहेत आणि त्याचवेळी न विकल्या गेलेल्या घरांची संख्याही सुमारे दीड लाखांवर आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत असल्याने आणि पुढील वर्षात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळेही मुंबईतील घरांच्या किमती कमी होतील असे या फर्मचे संचालक समंतक दास यांचे म्हणणे आहे.

दास म्हणाले की जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा वाढतो तेव्हा दर उतरतातच. सध्या मुंबईत घरांचा खप कमी झाला आहे त्यातच नवीन घरेही बांधली जात असल्याने बिल्डर लोकांवर घरे विक्रीसाठी दबाव आहे. त्याचा परिणाम किमतीवर होत असून त्यामुळे ग्राहकांचा मात्र फायदा होणार आहे. मुंबईत ४४ टक्के घरे विकली गेलेली नाहीत आणि त्याच्या दुप्पट संख्येने नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यातच निवडणुका तोंडाशी आहेत. सत्तेवर येणार्‍या नवीन सरकारची पॉलिसी काय असेल याचा अंदाज आत्ताच येणार नाही त्यामुळेही बिल्डर लोकांना घरे किमती कमी करून का होईना पण विकली जाणे गरजेचे वाटते आहे. त्याचा फायदा बाजार वाढण्यासही होणार आहे.

सध्या कर्ज व्याजदर वाढलेले आहेत आणि बिल्डरांचा नफा मात्र कमी झाला आहे. अनेक बडे विकसक कर्जाचे डिफॉल्टर झाले आहेत. वर्षाचे बॅलन्सशीट अॅडजस्ट करण्यासाठीही घरांची विक्री होणे गरजेचे आहेच त्यामुळेही घरांच्या किमती उतरणार आहेत असेही दास यांचे म्हणणे आहे.