तिरुनेलवेली – कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळच्या इदिनथकराई या गावात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेसह तीन मुलांचा समावेश आहे. तीनही मुलं पाच वर्षांखालील आहेत. स्फोटानंतर दोन घरांना आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. तसंच अनेक जण ढिगार्याखाली अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस उपमहानिरीक्षक सुमीथ सरन आणि पोलिस अधीक्षक विजेंद्र बिदारी हेदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. इदिनथकराई हे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील निदर्शनाचं मुख्य स्थळ आहे.
हा प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी इथले नागरिक गेल्या दोन वर्षांपासून विरोध करत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत आंदोलकांनी या प्रकल्पाचा विरोध केला होता. या प्रकल्पाच्या पहिल्या युनिटमध्ये 13 जुलै 2013मध्ये ऊर्जानिर्मितीला सुरुवात झाली होती. पोलिसांनी 2012 मध्ये इदिनथकराईजवळच्या कुनथनकुली गावांत छापा मारुन झोपड्यांमधून काही देशी बॉमब जप्त केले हेते. पोलिसांना संशय आहे की, गुन्हेगारी प्रकरणात सहभागी कुनथनकुलीचे काही लोक दोन घरांमध्ये राहिले होते.