एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक सक्तीच्या रजेवर

मुंबई- 100 कोटींचे कर्ज मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या भारतीय स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक श्यामल आचार्य यांना बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. यात माजी अतिरिक्त महाव्यवस्थाक के. के. कुमराह यांचाही समावेश आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.

याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) ला माहिती देण्यात आल्याचे बँकेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. बँकेचे व्यवहार प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे होण्यासाठी कटिबद्ध असून तपास यंत्रणांना या प्रकरणी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे एसबीआयने म्हटले आहे.

सीबीआयने रविवारी आचार्य यांच्यासह माजी महाव्यवस्थापक के. के. कुमराह यांच्या घरावर छापा घातला होता. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गोयल यांना 100 कोटींचे कर्ज हवे होते. यासाठी त्यांनी माजी व्यवस्थापक कुमराह यांची मदत घेतली. कुमराह यांनी आपले वजन वापरून गोयल यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यात कुमराह यांनी कर्ज मंजूर झाल्यानंतर स्वत:साठी 25 लाख आणि आचार्य यांच्यासाठी 15 लाख देण्याचे गोयल यांना सांगितले. कुमराह यांनी आचार्य यांना देण्यासाठी रोलेक्स कंपनीची आठ लाख रुपयांची दोन महागडी घडाळ्ये घेतली. आचार्य यांना ती देत असताना सीबीआयच्या अधिका-यांनी छापा घातला आणि तिघांना मुद्देमालासह अटक केली. यात दोन घड्याळे आणि सात लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यानंतर सीबीआयने आचार्य, कुमराह यांच्यासह आणि वर्ल्ड विंडो ग्रुपचे अध्यक्ष पियुष गोयल यांच्या मुंबई आणि कोलकात्याची घरांवर छापे टाकण्यात आले.

Leave a Comment