त्वचेच्या आतल्या शिरा स्पष्ट दाखविणार्‍या स्मार्ट ग्लासेस

वॉशिग्टन – शिरेतील इंजेक्शन किंवा सलाईन लावताना रूग्णाची शिर सापडणे हे महाकठीण काम असते. अगदी सरावलेल्या डॉक्टरना सुद्धा पहिल्याच प्रयत्नात रूग्णाची शीर सापडेलच याची खात्री देता येत नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही बरेचदा शीर सापडत नाही आणि त्याचा त्रास पेशंटला भोगावा लागतो. हा अनुभव जगभरात सगळीकडे सारखाच आहे. यावर एक मस्त उपकरण अमेरिकन कंपनी इव्हना मेडिकल यांनी तयार केले असून त्याचे व्यावसायिक उत्पादन पुढच्या वर्षापासून सुरू होणार आहे.

या कंपनीने चष्म्याच्या वरूनही लावता येतील अशा ग्लासेस किंवा काचा तयार केल्या आहेत. आईज ऑन ग्लासेस असे त्याचे नांव असून या ग्लासेस लावल्या की डॉक्टर किवा युजर त्वचेच्या आतील शिरा स्पष्टपणे पाहू शकतात. परिणामी इंजेक्शन साठी किंवा सलाईन लावण्यासाठी एकदाच सुई टोचावी लागते. यासाठी मल्टी स्पेक्ट्रल इमेजिंगचा वापर केला गेला असून त्यामुळे लाईटची तीव्रता तिप्पट वाढते. विशेष म्हणजे पेशंटची त्वचा आहे तशीच दिसते मात्र उपकरणासोबत असलेले ड्यूअल कॅमेर्‍यामुळे शिरांची इमेज स्पष्ट होते.

शिरांच्या इमेजेसचे प्रोसेसिंग करणार्‍या या कॅमेर्‍यातून टिपल्या गेलेल्या इमेज वायफाय, ब्ल्यू टूथच्या सहाय्याने ट्रान्समीटही करता येतात. त्यामुळे दुर्गम भागातील मेडिकल स्टाफला आणीबाणीच्या प्रसंगात सहाय्य करता येते. यात स्पिकरचीही सोय केली गेली आहे असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment