लठ्ठपणा अपघातास कारण

लठ्ठपणाचे अनेक दुष्परिणाम आपण नित्य अनुभवत असतोच. परंतु लठ्ठ व्यक्तींच्या कारचे अपघात तुलनेने जास्त असतात आणि जितका लठ्ठपणा कमी तेवढी अपघाताची शक्यता कमी असते. म्हणजे लठ्ठपणामुळे स्वत: कार चालवणे अधिक जोखमीचे होऊ शकते. अमेरिकेमध्ये नॅशनल हायवे ट्रॅङ्गिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशन या खात्याने केलेल्या पाहणीमध्ये ही गोष्ट आढळून आली आहे. या खात्याने १९९६ ते २००८ अशी बारा वर्षे अमेरिकेतील वाहनांच्या अपघाताचे सूक्ष्म निरीक्षण केले.

अपघात होताना गाडी चालवणारा ड्रायव्हर कोण होता आणि त्याचे वजन किती होते? याच्याही नोंदी या खात्याने ठेवल्या. तेव्हा असे आढळले की, ड्रायव्हरचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे थोडक्यात शरीराची जाडी, उंची आणि वजन यांचा निर्देशांक अधिक असेल तर अपघात जास्त झालेले आहेत. अमेरिकेत ङ्गार अपघात होतच नाहीत, कारण अमेरिकेतले नागरिक वाहतूक विषयक नियमांचे कठोरतेने पालन करत असतात. अपघात कमी झाले असले तरी तेवढे सुद्धा होता कामा नयेत, असा तिथल्या ट्रॅङ्गिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच अपघातांच्या कारणांचा त्यांनी अतीशय खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष इमर्जन्सी मेडिसीन जर्नल या मासिकात प्रसिद्ध झाले आहेत. अपघात झाल्यानंतर त्यास कारणीभूत ठरलेल्या ड्रायव्हरचे लायसन्स जप्त केले जाते आणि त्यावरच्या नोंदीवरून त्याचा बॉडी मास इंडेक्स काढला जातो. या इंडेक्सचा केवळ अपघात होण्याशीच संबंध असतो असे नाही तर अपघातात मरण्याच्या शक्यतेशीही संबंध असतो, असे या निरीक्षणांमधून दिसून आले आहे. वाहन कोणतेही असले तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जे पट्टे बांधलेले असतात त्या पट्ट्यांचा आकार तोच असतो, मात्र जाड व्यक्तीच्या अंगाभोवती हा पट्टा नीट बसत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती अपघात झाल्यानंतर मरण्याची शक्यता जास्त असते.

३० ते ३५ इंडेक्स असणार्‍यांमध्ये मरण्याची जोखीम २१ टक्के आहे, परंतु हा इंडेक्स ज्यांच्या बाबतीत ४० पेक्षाही जास्त असतो त्याची कारमध्ये मरण्याची जोखीम ८१ टक्के असते. त्यामुळे आता कारचे डिझाईन, ड्रायव्हरचे सीट आणि पट्टे यांच्या बाबतीत काही बदल केले पाहिजेत, असे म्हटले जायला लागले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment