भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेसाठी काल झालेल्या निवडणुकीत ७१ टक्के विक्रमी मतदान झाले. अभूतपूर्व सुरक्षा यंत्रणेच्या करड्या नजरेखाली या राज्यातले मतदान सर्वसाधारणपणे शांततेत पार पडले. पण केवळ दोन ठिकाणी हिंसक घटना घडून एकाचा मृत्यू झाला. बाकी २३० मतदारसंघांमध्ये शांततेत आणि उत्साहात मतदान झाले.
नक्षलवाद्यांचा उपद्रव असलेल्या बालाघाट मतदारसंघातील तीन मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ बदलण्यात आली होती. सुरक्षा उपायांसाठी म्हणून तिथले मतदान राज्यातल्या अन्य मतदारसंघांच्या एक तास आधी सुरू करण्यात आले आणि एक तास आधी संपविण्यात आले. मोरेना आणि भिंड जिल्ह्यांमध्ये दोन गटातील चकमकींमध्ये तसेच मतपेट्या पळवण्याच्या प्रकारामध्ये एकाचा मृत्यू होऊन एकजण जखमी झाला.
हे दोन्ही जिल्हे दरोडेखोरांचे वर्चस्व असलेल्या चंबळ खोर्यात समाविष्ट आहेत. मोरेना जिल्ह्यातील सुमावली मतदारसंघात भाजपा आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत चकमक झडून एकजण मरण पावला, तर भिंड जिल्ह्यातल्या अलीबहादूरकापुरा या मतदारसंघात मतपेट्या पळवणार्या गुंडांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात एक जण जखमी झाला.
अशा घटना घडूनही मतदान उत्साहात आणि विक्रमी पार पडले. यापूर्वी राज्यात ६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २००८ साली झालेली ही नोंद विक्रमी समजली जात होती. मात्र कालच्या मतदानाने हा जुना विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित झाला. दरम्यान मिझोराम विधानसभेसाठीही शांततेत ८१ टक्के मतदान झाले.