तेजपालच्या जामीन अर्जावर पुन्हा उद्या सुनावणी

मुंबई – तहलकाचे तरुण तेजपाल यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तेजपाल यांना कोर्टातूनही दिलासा मिळालेला नाही. तेजपाल यांच्या जामीनअर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार असून कोर्टाने तेजपाल यांना अटक करण्यास मनाईदेखील केलेली नाही. त्यामुळे तेजपाल यांच्याासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी तहलकामधील महिला सहका-यावर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण तेजपाल यांच्यावर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी या घटनेतील तिघा साक्षीदारांचे तसेच तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोभा चौधरी यांचे जबाब घेतले आहेत. तर पिडीत तरुणीचा जबाबही लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तरुण तेजपाल यांनी सोमवारी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दिला होता. या अर्जावर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी झाली.

गेल्या काही दिवसांपासून केवळ राजकीय उद्देशान ही एफआयआर दाखल करण्यात आली असून गोव्याचे मुख्यमंत्री या प्रकरणात जास्त दखल देत आहेत असे तेजपाल यांच्यावतीने कोर्टासमोर सांगण्यात आले. या सुनावणीत तेजपाल यांनी पुन्हा एकदा पिडीत तरुणीवर आरोप केल्याचे वृत्त आहे. गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या जामीनअर्जाला तीव्र विरोध दर्शवला.

यानंतर न्यायालयाने गोवा पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत बुधवारी पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. मात्र या कालावधीत तेजपाल यांना अटक करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास कोर्टाने नकार देत तेजपाल यांना दिलासा दिला नाही.