अण्णांना शहीद करण्याचा केजरीवालांचा कट होता- स्वामी अग्निवेश

औरंगाबाद – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा दिल्ली उपोषणात बळी देण्याचा अरविंद केजरीवालांचा प्लॅन होता, असा खळबळजनक आरोप टीम अण्णातून हकालपट्टी झालेले स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

उपोषण लांबल्यामुळे अण्णांच्या जीवाला धोका होईल, असे आम्ही केजरीवाल यांना सांगितले होते. मात्र, क्रांती कुर्बानी मानती है. अण्णा शहीद झाल्यास आंदोलन मोठं आणि यशस्वी होईल, असे केजरीवाल म्हणाल्याचे अग्निवेश यांनी सांगितले आहे.

अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत तब्बल 11 दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपोषण लांबवणे आणि त्यातून अण्णांचा बळी देऊन त्यांना शहीद ठरवणे, असा केजरीवालांचा कट होता, असे अग्निवेश यांनी म्हटले आहे. मात्र, ही बाब अण्णांच्या लक्षात आल्याने त्यांनी विलासरावांना बोलावले, असेही अग्निवेश यांनी सांगितले.