नवी दिल्ली – गुजरात सरकारने एका तरुणीवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणात प्रथमच गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप झाला आहे. नरेंद्र मोदी त्या’ तरुणीच्या प्रेमात पडले होते. ती तरुणी नरेंद्र मोदींना अडचणीत आणण्याची शक्यता असल्याने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन, तिच्यावर पाळत ठेवली गेली असा खळबळजनक आरोप या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केला आहे.
माझ्याजवळ त्या’ तरुणीची आक्षेपार्ह अवस्थेतली सीडी असल्याचा मोदींना संशय आला होता. म्हणून 2010 ते 2012 मध्ये माझ्या विरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले असा आरोप शर्मा यांनी केला आहे. प्रदीप शर्मा यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, या हेरगिरी प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. गुजरातचे तत्कालिन गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या साहेबांसाठी पोलिसांना पाळत ठेवण्याचे आदेश दिले ते साहेब मोदी असल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
तरुणीच्या वडिलांच्या सांगण्यावरुन पाळत ठेवल्याचा गुजरात सरकारचा दावा शर्मा यांनी फेटाळून लावला. मूळची भूजची असलेली पण बंगळूरुमध्ये स्थायिक झालेल्या या तरुणीबरोबर आपण 2004 मध्ये नरेंद्र मोदींची ओळख करुन दिली होती. तेव्हा ती तरुणी 27 वर्षांची होती. त्यानंतर अनेक वर्ष ती तरुणी आणि नरेंद्र मोदी संपर्कात होती असे प्रदीप शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.