सिरियातील अंतर्गत बंडाळीत ११ हजारावर मुले मृत्यूमुखी

सिरीयातील देशांतर्गत बंडाळीत आणि युद्धात गेल्या तीन वर्षात किमान ११,४२० मुले ठार मारली गेल्याचा धक्कादायक अहवाल लंडनमधील रिसर्च संस्थेने दिला आहे. या अहवालानुसार सिरीयात जाणूनबुजून लहान मुलांना ठार केले जात आहे व त्यातही मुलींच्या तुलनेत मुले अधिक मारली जात आहेत.

या संस्थेने मिळविलेल्या माहितीनुसार १ वर्षांच्या मुलांना छळ करून ठार केले गेले आहे तर बॉम्ब हल्ल्यात सर्वाधिक मुलांचा बळी गेला आहे. ज्या प्रकारे सिरीयात लहान मुलांना ठार केले जात आहे ते पाहता तेथील परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे मतही व्यक्त केले गेले आहे. गेल्या तीन वर्षात १७ वर्षांखालील किमान ११४२० मुले ठार केली गेली असून पैकी गेल्या वर्षात बंदुकीने ३२९, बॉम्बमुळे ७६४ तर १०० हून अधिक मुले छळ करून ठार केली गेली आहेत. अलेप्पो येथे सर्वाधिक संख्येने मुले मारली गेली असून येथे २२२३ मुले मृत्युमुखी पडली आहेत.

अंतर्गत बंडाळीमुळे शाळा ओस पडल्या आहेत आणि त्यामुळे शरणार्थी मुलांची संख्या प्रचंड प्रमाणावर असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सिरीयातील लढाई ही बालपणाविरूद्धची लढाई असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.