लोपबुरी येथे पार पडली माकडांची मेजवानी

बँकॉक- थायलंडची राजधानी बँकॉकपासून सुमारे १५० किमीवर असलेल्या लोपबुरी येथे दरवर्षीप्रमाणेच यंदाही माकडांसाठीची खास मेजवानी पार पडली. रविवारी पार पडलेल्या या मेजवानीला प्रचंड संख्येने माकडे व पर्यटकही हजर होते.

लोपबुरी येथे दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या प्रकारे मेजवानीचे आयोजन केले जाते. मंकी बफेट असे या मेजवानीला म्हटले जाते. या दिवशी माकडांसाठी विविध प्रकारची फळे, भाज्या मांडल्या जातात. यंदाही चार हजार किलो फळे व भाज्या येथे मांडल्या गेल्या होत्या. त्यात सफरचंदापासून कलिगडांपर्यंत सर्व फळे तर गाजरापासून मुळ्यापर्यंत भाज्यांचा समावेश होता. मक्याची कणसे खास आकर्षण होतीच पण त्याचबरोबर आईस्क्रीम, केक आणि कोल्ड ड्रिंकही ठेवली गेली होती.

फळांचा, भाज्यांवर माकडांनी ताव मारला तर ही मेजवानी पाहण्यासाठी आलेल्या हजारो पर्यटकांनी आईस्क्रीम, केक व थंड पेयांचा आनंद लुटला. यावेळी संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आलेल्या पर्यटकांनी मेजवानीसाठी आलेल्या माकडांना भेटवस्तू दिल्याचेही समजते.

Leave a Comment