महागाई आणखी वाढण्याची शक्यता

मुंबई – तुम्ही डिसेंबर महिन्याचा किराणा माल खरेदी करण्यासाठी जवळपासच्या किराणा दुकानात किंवा एखाद्या मॉलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला देशातला महागाईचा आलेख वरचेवर वाढत चालल्याचे प्रत्यंतर येईल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल महागल्यामुळे, मजुरीचे दर वाढल्यामुळे, वाहतूक खर्च वाढल्यामुळे आणि रुपया घसरल्यामुळे येत्या महिनाभरात विविध वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झालेली दिसून येणार आहे.

विशेषत: बिस्किटस्, साबण, डिटर्जंट, तेल, टूथपेस्ट इत्यादींच्या किंमती अवाक्याच्या बाहेर चालल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. विविध कंपन्यांनी आपल्या मालाच्या ठोक किंमतीत गेल्या दोन महिन्यात २ ते १७ टक्के एवढी वाढ केली आहे. तेवढीच वाढ किरकोळ खरेदीत अनुभवास येईल. त्याशिवाय चालू वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा ऑक्टोबरमध्ये रुपयाची किंमत १६ टक्क्यांनी घसरली आहे. त्याचाही परिणाम महागाईवर झाल्याशिवाय राहणार नाही.

दूध, कोको आणि गहू यांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारची बिस्किटस् मोठ्या प्रमाणावर महाग होणार आहेत. साबण आणि डिटर्जंट यासाठी वापरले जाणारे रॉ मटेरियल तसेच रंगांमध्ये वापरले जाणारे रासायनिक द्रव आणि खोबरे महाग झाले आहे. त्यामुळे या कच्च्या मालांपासून तयार होणार्‍या सगळ्या वस्तू आता महाग झालेल्या दिसतील.