बंगळूरमध्ये एक हजारावर एटीएम बंद

बंगळूर – बंगळूर शहरामधील एका एटीएम सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या हल्ल्यामुळे सावध झालेल्या पोलीस यंत्रणेने रक्षक नसलेले शहरातील १,०३७ एटीएम केंद्रे बंद केली आहेत. या हल्ल्यानंतर शहरामध्ये बरीच एटीएम केंद्रे रक्षकाविना चालू रहात असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे सरकारने अशा केंद्रांच्या विरोधात ही कडक कारवाई केली.

सरकारने या एटीएम केंद्रांची दखल घेतल्यानंतर काही बँकांनी तातडीने हालचाली करून रक्षक नेमले. कॅनरा बँकेने ताबडतोब आपल्या ५०८ एटीएम केंद्रांवर रक्षकांची नियुक्ती तर केलीच शिवाय प्रत्येक केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

कॅनरा बँकेचे बंगळूर शहरात मोठे व्यवहार आहेत. या बँकेच्या एटीएम केंद्रांमध्ये दिवसभरात दीड लाख व्यवहार होतात आणि त्यातून ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. सरकारने रक्षक नेमण्याच्या बाबतीत सक्ती करायला हरकत नाही, परंतु रक्षकांची नियुक्ती आणि कॅमेरे बसवणे या गोष्टी वेळखाऊ आहेत. दरम्यान, केंद्रे बंद केली तर हजारो लोकांची गैरसोय होईल अशी तक्रार कॅनरा बँकेचे सरव्यवस्थापक रविंद्र भंडारी यांनी केली.