देशात पुढील वर्षापासून प्लॅस्टीक नोटा चलनात

नवी दिल्ली – बनावट नोटांचा गंभीर प्रश्न निकाली काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकणार्‍या प्लॅस्टीकच्या चलनी नोटा पुढील वर्षात देशभरात आणण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गेले कांही महिने जयपूर, सिमला, भुवनेश्वर, म्हैसूर आणि कोचीन या पाच शहरात १० रूपयाच्या प्लॅस्टीक नोटा चलनात प्रायोगिक तत्त्वावर आणल्या गेल्या होत्या आणि हा प्रयोग अतिशय यशस्वी झाल्याने आता संपूर्ण देशात या नोटांचा वापर सुरू केला जाणार आहे.

लोकसभेच्या तोंडावर आलेल्या निवडणुका लक्षात घेता परराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा भारतात येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला प्लॅस्टीक नोटा लवकरात लवकर चलनात आणण्यासाठी दबाव टाकला आहे. गेले तीन ते चार वर्षे प्लॅस्टीक नोटा चलनात आणण्यासंबंधी चर्चा होत आहे मात्र आता या नोटा चलनात आणण्याची पूर्ण तयारी झाली असल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत.

प्लॅस्टीक नोटा सध्याच्या कागदी नोटांपेक्षा अधिक काळ टिकणार्‍या आहेत. त्यामुळे नोटा छापण्याची वेळही कमी येईल तसेच या नोटांची सहजी नक्कल करून बनावट नोटा छापणे शक्य होणार नाही असे सांगून हे अधिकारी म्हणाले की रिझर्व्ह बँक दरवर्षी २ लाख कोटी रूपये मूल्याच्या नोटा छापत असते आणि दरवर्षी खराब झाल्याने २० टक्के चलनी नोटा चलनातून काढून टाकल्या जातात.