लालू प्रसादांची जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी झारखंड उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याच्या विरोधात सुप्रीम न्यायालयात धाव घेतली असून त्यावर २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

बिहारमध्ये सत्तेवर असताना चाईबासा ट्रेझरीतून ३७.७ कोटी रूपये काढल्याप्रकरणी लालूंची चौकशी सुरू होती.लालू प्रसाद यादव तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र व अन्य ४३ जणांना बिहार येथे झालेल्या चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावल्या आहेत. लालूंना पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली असून ते सध्या जेलमध्येच आहेत.

विशेष सीबीआय न्यायालयाने या शिक्षा सुनावल्या असून त्यात जामीन मिळविण्यासाठी लालूंनी झारखंड उच्च न्यायालयात अपिल केले होते मात्र ते फेटाळण्यात आले. त्यानंतर या निकालाला आव्हान देण्यासाठी लालू सुप्रीम कोर्टात गेले आहेत. शिक्षा सुनावली गेल्यानंतर लालूंचे संसद सभासदत्व रद्द केले गेले आहे.