कुणाल घोष यांच्या घरावर छापा; हार्डडिस्क जप्त

कोलकाता – प. बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांच्या घरावर पोलीसांनी आज छापा टाकला. या प्रकरणी घोष यांना काल अटक करण्यात आली होती. त्यांनाही आजच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी सोबत आणले होते.

यादरम्यान पोलीसांनी त्यांच्या घरातून एक हार्डडिस्कही जप्त केली आहे. सुमारे तासभर ही कारवाई सुरु होती. घोष यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 406 आणि 120बी नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, घोष यांनी अटकेत असताना फेसबुकवर पोस्ट कशी टाकली, याचीही चौकशी पोलीसांकडून करण्यात येत आहे.

आपली अटक म्हणजे कट असून याप्रकरणातील सत्य शोधून काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या इतर दोन नेत्यांची मदत घेण्यात यावी, असेही घोष यांनी म्हटले आहे. या चिटफंड घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.