आंध्रात हैदराबादवरून तणाव

हैदराबाद – केंद्र सरकारने तेलंगण निर्मितीची वैधानिक प्रक्रिया वेगाने सुरू करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली असल्याने सीमांध्र आणि तेलंगण या दोन्ही भागात हैदराबादचे काय होणार, यावरून मोठा तणाव निर्माण झालेला आहे. हैदराबाद ही दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असेल, असे केंद्र सरकारने म्हटले असले तरी नेमका कोणता भाग संयुक्त राजधानीचा असेल याबाबत सीमांध्र आणि तेलंगण या दोन्ही भागातील लोकांमध्ये अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत.

हैदराबाद ही संयुक्त राजधानी असेल असे म्हटले जात असले तरी नेमका कोणता भाग राजधानीचा असेल हे अजून निश्‍चित झालेले नाही. हैदराबाद महानगरपालिकेच्या अखत्यारीतील हैदराबाद शहर आणि हैदराबाद विकास प्राधिकरणाच्या ताब्यात असलेला विशाल हैदराबादचा परिसर असे शहराचे दोन भाग होतात. यातला कोणता भाग संयुक्त राजधानीचा असेल हे स्पष्ट होत नाही.

याशिवाय हैदराबाद जिल्हा आणि भद्राचलम्सहित हैदराबाद असेही हैदराबादचे दोन भाग आहेत. मग हेही भाग संयुक्त राजधानीचे होणार की काय, असा प्रश्‍न आहे. सीमांध्र भागातील लोकांनी भद्राचलम्सहित हैदराबाद जिल्हा संयुक्त राजधानीचा भाग असावा अशी मागणी केली आहे. पण तेलंगणवासियांना ती मंजूर नाही. त्यांनी केवळ हैदराबाद म्हणजे महानगरपालिकेच्या ताब्यातला भाग हाच संयुक्त राजधानीचा भाग असावा असे म्हटले आहे.